अधिकारी, पोलिस अंमलदारांचा सत्कार
बीड दि.30 (प्रतिनिधी):
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी गुरूवारी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रण प्रणालीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर आणि चेतना तिडके यांची उपस्थिती होती. यावेळी आयजी मित्र यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व पोलीस अंमलदारांचा सत्कार केला.
विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी पोलीस दलाला थेट आणि कडक निर्देश दिले. मागील निवडणूक काळात गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीत शरीराविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेविरोधातील गुन्हे, विशेषतः चोऱ्या आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. त्यांनी पोलिस उपअधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी अवैध धंद्यांवर केलेल्या कारवायांचा आढावा घेतला. तसेच, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या प्रलंबित तपासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. अवैध धंद्यावर प्रभावी कारवाया करण्याच्या सूचना दिल्या.
अधिकारी, अंमलदार यांचा गौरव
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये बीड शहर, पिंपळनेर, परळी शहर, अंबाजोगाई ग्रामीण, नेकनूर, सह सुमारे १५ ते २० कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
पोलीस अधीक्षक वाचक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वजूरकर हे नियत वयोमानानुसार उद्या दिनांक 31/10/2025 रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

हरवलेली मुलांसंदर्भात कारवाई करा
मिश्र यांनी फरार आरोपींचा शोध घेणे, हरवलेली लहान मुले आणि अपहृत मुली यांचा तपास करणे तसेच जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादीला परत करण्यासाठी प्रयत्न करणे आणि प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढणे अशा सूचना दिल्या. त्यांनी तपासात ई-साक्ष ॲपचा प्रभावी वापर करण्यावरही भर दिला.