धुळे-सोलापूर महामार्गावर मिनीट्रॅव्हल्सवरील १२ बॅगा लंपास!
महामार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज मिळविले, तिघांचा शोध सुरु


बीड दि. ३०: धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा ते पारगाव टोल नाका परिसरात गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेआठच्या सुमारास दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. एका मिनी ट्रॅव्हल्स (क्र. डी.डी. ०१ ए.सी. ९५४०) गाडीवर ठेवलेल्या १२ बॅगा दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला फेकून लंपास केल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रॅव्हल्स गाडी पारगाव टोलनाक्याकडून चौसाळामार्गे राजस्थानला जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गाडीवरील बॅगा एक-एक करून रस्त्याच्या कडेने फेकल्या आणि त्यानंतर त्या बॅगा उचलून दुचाकीवरून पसार झाले.
चोरी गेलेल्या बॅगांपैकी एका बॅगमध्ये तब्बल ३० हजार रुपये रोख रक्कम असल्याची माहिती चालकाने दिली आहे. अचानक घडलेल्या घटनेने घाबरलेल्या ट्रॅव्हल्स चालकाने गाडी थेट पुढे काही अंतरावर थांबवली. ही माहिती मिळताच महामार्ग पोलीस मांजरसुंबा विभागाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक बालाजी ढगारे व त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून, दुचाकीस्वार चोरट्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी संबंधित ट्रॅव्हल्स चालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महामार्गावर दिवसा झालेल्या या चोरीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!