वडवणी (बीड): बीड जिल्ह्यात सणासुदीच्या काळात चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असतानाच, वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे मंगळवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास अज्ञात ५ ते ६ दरोडेखोरांनी एका घरात प्रवेश करून ११ लाख २९ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कवडगाव येथील रहिवासी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबनराव धुराजी मांजरे यांच्या घरी ही घटना घडली. पहाटेच्या वेळी दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी मांजरे यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवत धमकावले. दरोडेखोरांनी कपाटातील रोख रक्कम आणि बाजूच्या खोलीत असलेल्या लोखंडी पेटीतील ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. विशेष म्हणजे, या पेटीमध्ये मांजरे यांनी मुलाच्या लग्नासाठी जमवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोख रक्कम होती. दरोडेखोरांनी हा सर्व ऐवज घेऊन पळ काढला, ज्याची एकूण किंमत ११ लाख २९ हजार ८०० रुपये इतकी आहे.
या घटनेमुळे वडवणी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या सहायक पोलीस निरीक्षक वर्षा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.