फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं कनेक्शन

अंबादास दानवेंनी दोन ‘पीए’ची नावं केली उघड

फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप; अंबादास दानवेंनी दोन ‘पीए’ची नावं केली उघड
सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमागे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मृत डॉक्टर तरुणीने डॉ. धुमाळ यांना लिहिलेल्या पत्रात या दबावाचा स्पष्ट उल्लेख असल्याचे दानवे यांनी शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.
आत्महत्या आणि खासदाराचे ‘कनेक्शन’
अंबादास दानवे यांच्या आरोपानुसार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फिटनेस सर्टिफिकेट बदलण्यासाठी स्थानिक डॉक्टरांवर पोलिसांकडून दबाव आणला जात असे. अशाच एका प्रकरणात, फलटणमधील भाजपच्या माजी खासदाराचे दोन स्वीय सहाय्यक (PA) रुग्णालयात गेले होते. त्यांनी डॉक्टर तरुणीचे माजी खासदारांशी फोनवर बोलणे करून दिले. यावेळी खासदारांच्या पीएने आणि पोलीस अधिकारी गोपाळ बदने यांनी डॉक्टर तरुणीला ‘बीडची’ असल्यावरून हिणवले, असा आरोप दानवे यांनी केला आहे.
‘ते’ दोन पीए कोण?
दानवे यांनी दावा केला की, तरुणीच्या पत्रात माजी खासदारांच्या ज्या दोन स्वीय सहाय्यकांचा उल्लेख आहे, त्यांची नावे ‘राजेंद्र शिंदे’ आणि ‘नाग टिळक’ अशी आहेत. या दोघांनीच डॉक्टर तरुणीचे माजी खासदारांशी फोनवर बोलणं करून दिलं. याच राजकीय दबावामुळे तरुणीने आत्महत्या केली आणि सुसाईड नोटमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे, असे दानवे म्हणाले.
दानवेंची मागणी आणि गृहखात्यावर टीका
या प्रकरणी सगळ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत अंबादास दानवे यांनी गृहखात्याचा कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या खात्याचे लोक डॉक्टरांशी कसे वागतात, यात ‘सत्तेचा माज’ दिसतो, असे ते म्हणाले.
दानवे यांनी पुढील मागण्या केल्या:
* डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील अधिकारी चौकशीसाठी नकोत; महिला अधिकारी चौकशीसाठी नेमा.
* माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या प्रकरणात सहआरोपी करा.
* महाडिक नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करा (हा अधिकारी प्रमोशन घेऊन डीवायएसपी म्हणून नंदूरबारला गेला असून तो माजी खासदारांचा ‘दलाल’ होता, असे दानवे म्हणाले).
इतर प्रकरणांमध्येही कैद्यांना ‘फिट’ किंवा ‘अनफिट’ प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरांवर दबाव आणला जात असे. राजकीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी असे करणे चुकीचे असून ही ‘भाजपची सत्तेची मस्ती’ असल्याचे दानवे म्हणाले.
यावेळी दानवे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यावरही गैर उत्खननाच्या (Illegal Mining) एका प्रकरणात शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 कोटी रुपयांचा बोजा चढवल्याचा खोटा प्रकार केल्याचा आरोप केला. सत्तेचा माज दाखवून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना अशाप्रकारे नामोहरम केले जात आहे, असे ते म्हणाले.

error: Content is protected !!