फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ‘खासदार कनेक्शन’, पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप; तपासावर दबाव?



फलटण (सातारा): महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप, ‘खासदार कनेक्शन’ उघडकीस
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या रात्री (गुरुवारी) आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. मात्र, आता या आत्महत्येला अत्यंत गंभीर वळण लागले असून, मृत डॉक्टरच्या हातावर आढळलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदने याच्यावर चारवेळा बलात्कार केल्याचा आणि पोलीस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
या प्रकरणी मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.


खासदार आणि शवविच्छेदन अहवालावर दबाव?
* काकांचे गंभीर आरोप: मृत डॉक्टरच्या काकांनी आरोप केला आहे की, त्यांच्या पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता. यामुळे ती अत्यंत मानसिक तणावाखाली होती. “तणावामुळे माझे आयुष्य संपवावे लागेल,” असे तिने वारंवार वरिष्ठांना आणि नातेवाईकांना सांगितले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


* आतेभावाकडून ‘खासदार कनेक्शन’चा आरोप: मृत डॉक्टरच्या आतेभावाने केलेल्या आरोपानुसार, आत्महत्येपूर्वी डॉक्टरला फोन करणाऱ्यांमध्ये फलटण भागातील एका खासदाराचा सहभाग होता. “फक्त खासदार इतकाच उल्लेख आहे, नाव कोणाचेही नाही. खासदारांच्या पीएने खासदारांना फोन लावून दिला आणि त्यानंतर मॅडम त्यांच्याशी बोलल्या होत्या,” असे त्यांनी म्हटले आहे.


* दोन महिन्यांपासून तक्रारीकडे दुर्लक्ष: आतेभावाने असाही आरोप केला आहे की, डॉक्टरने दोन-तीन महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच, ‘दबाव येत असल्याबद्दल’ तिने आपल्या मेडिकल ऑफिसर असलेल्या चुलत बहिणीला काही दिवसांपूर्वी सांगितले होते.


नेमके प्रकरण काय होते?
महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादामध्ये अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांची अंतर्गत चौकशी सुरू होती. मात्र, डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून थेट पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेत बलात्कारासारखा गंभीर आरोप करून आत्महत्या केल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आता या सर्व आरोपांच्या आधारावर कसून तपास करत आहेत.

error: Content is protected !!