पंतप्रधान मोदींची यंदाची दिवाळी गोव्यात नौसैनिकांसोबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दरवर्षीचा पायंडा कायम राखत, यंदाची (२०२५) दिवाळी गोव्यातील नौसैनिकांसोबत साजरी केली. गोव्याच्या नेवल बेसवरून नौदलाच्या जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणं हे माझं सौभाग्य आहे. माझ्या एका बाजूला अथांग समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वीर सैनिकांचं सामर्थ्य आहे.”
“सूर्यकिरणांची चमक म्हणजे दिवाळीचे दिवे”:
समुद्राचे वर्णन करताना पंतप्रधानांनी एक भावनिक उपमा दिली. ते म्हणाले, “समुद्राच्या पाण्यावरील ही सूर्यकिरणांची चमक म्हणजे वीर जवानांसाठी दिवाळीचे दिवे आहेत.”
INS विक्रांतवर संवाद आणि कौतुक:
आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवरून वीर नौसैनिकांशी संवाद साधताना, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला कठोर संदेश दिला.
जवानांचे कौतुक करताना ते म्हणाले, “आयएनएस विक्रांतवर काल घालवलेल्या रात्रीचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. हे जहाज वगैरे आपल्या जागी आहे. पण जी आवड तुमच्यामध्ये आहे, त्यामुळे जिवंतपणा त्यात येतो. हे जहाज लोखंडाचं आहे, पण तुम्ही जेव्हा त्यामध्ये उतरता, तेव्हा त्यात शौर्य उतरतं.”
यंदाची दिवाळी सैनिकांमध्ये साजरी करण्याचे आपले सौभाग्य आहे, असे सांगत पंतप्रधानांनी नौसैनिकांचे आभार मानले.