ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अकोल्यात पहिली आत्महत्या; ‘आरक्षण सुरक्षित नाही’ म्हणत ओबीसी नेत्याने संपवलं आयुष्य
अकोला: (९ ऑक्टोबर, २०२५) – मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी (OBC) आरक्षणाला धोका निर्माण झाल्याच्या भीतीतून अकोला जिल्ह्यात धक्कादायक आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसी नेते आणि राष्ट्रवादीचे खंदे समर्थक विजय बोचरे (वय ५९, रा. आलेगाव, ता. पातुर) यांनी आज (९ ऑक्टोबर) पहाटे आपल्याच गावातील बसस्थानकाच्या प्रवासी निवाऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
बोचरे यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र, गंभीर आरोप
आत्महत्येपूर्वी विजय बोचरे यांनी मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांना उद्देशून लिहिलेले एक भावनिक पत्र आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवले होते. या पत्रातून त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर गंभीर आरोप केले आहेत.
पत्रातील प्रमुख मुद्दे:
* आरक्षण असुरक्षित: राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैद्राबाद गॅझेटियरनुसार काढलेला अध्यादेश मूळ ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा आहे.
* भविष्य धोक्यात: “आमच्या मुला-बाळांचं भविष्य धोक्यात आलं आहे. शिक्षणात, नोकरीत आणि राजकारणात आमचं स्थान हरवत चाललं आहे. ओबीसींचे आरक्षण संपल्यात जमा आहे.”
* सरकारी धोरणावर टीका: सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडलं आहे, मूळ प्रवाहात न येऊ देण्याचेच हे सरकारी धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला.
* मागणी आणि आवाहन: “आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही,” असे म्हणत त्यांनी ‘जातीय जनगणना झाली पाहिजे’ आणि ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये’ असे स्पष्ट आवाहन केले होते.
पहाटे अडीचच्या सुमारास बोचरे यांनी हे भावनिक स्टेटस ठेवून काही वेळातच गळफास घेतला. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. एका नेत्याने आरक्षणासाठी केलेल्या या आत्महत्येमुळे प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.