बीड दि.20 (प्रतिनिधी):
गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील गोविंद सुखदेव शेळके (वय 56), केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शनिवारी (दि.20) रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांनी गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील आर्थिक अनियमिततेसंबंधी चालू खात्याअंतर्गत चौकशी अहवाल व्यवस्थित पाठवून मदत करण्यासाठी शेळके यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 18 सप्टेंबर रोजी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोनि. राहुलकुमार भोळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर शेळके यांनी तडजोडीअंती 5 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. 20 सप्टेंबर रोजी तक्रारदार यांच्या घराजवळील कृषी कॉलनी येथे, पंचासमक्ष तक्रारदारांकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना बीड एसीबीच्या पथकाने शेळके यांना रंगेहात पकडले. पंचासमक्ष लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस समाधान कवडे, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल राठोड, अविनाश गवळी, प्रदीप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, अंबादास पुरी व गणेश मेत्रे यांनी सहभाग घेतला.