बीड जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचा ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आज आणखी १५० कोटी रुपये वितरित केले आहेत. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला अधिक वेग येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीडकरांना एक अनोखी भेट दिली आहे.
या निधीमुळे येत्या आर्थिक वर्षातील रेल्वे विभागाच्या खर्चासाठी राज्याचा हिस्सा पूर्ण करण्यास मदत होईल. एकूण २६१ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च ४,८०५ कोटी रुपये असून, त्यात राज्याचा ५०% वाटा आहे. यापूर्वीच राज्य शासनाने २,०९१ कोटींहून अधिक निधी दिला आहे.
१७ सप्टेंबर रोजी रेल्वेसेवा सुरू होणार
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर, म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी, ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावर रेल्वेसेवा सुरू होणार आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी दिशा मिळेल आणि जिल्ह्यात गुंतवणूक व रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.