गेवराई मधील डॉक्टरला सायबर ठगांनी फसवलं; मुंबई क्राइम ब्रांचच्या नावाने ५ लाख उकळले

मुंबई क्राइम ब्रांच आणि टेलीकॉम अथॉरिटीच्या नावाने फसवणूक
बीड: पैशांची अफरातफर (money laundering) आणि इतर गैरकृत्यांसाठी तुमच्या आधार कार्डचा वापर करण्यात आला आहे, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला तब्बल ५ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
डॉ. सय्यद मुख्तार नजीर (वय ४०) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. २ ऑगस्ट रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितले की, त्यांच्या आधार कार्डचा वापर करून मुंबईमध्ये एक सिमकार्ड खरेदी करण्यात आले आहे. या सिमकार्डचा वापर ‘मनी लाँड्रिंग’साठी करण्यात आला असून, यामुळे त्यांचा मोबाइल क्रमांक आणि आधार कार्ड ५ वर्षांसाठी ‘ब्लॉक’ केले जाईल, अशी धमकीही त्या व्यक्तीने दिली.
या प्रकरणी अडकलेल्या डॉ. सय्यद यांना यातून बाहेर पडण्यासाठी तसेच जामीन, वकिलाची फी आणि केस बंद करण्याच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने ५ लाख ९५ हजार २९ रुपये उकळण्यात आले. त्यानंतर पुन्हा आरोपींनी १ लाख रुपयांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉ. सय्यद यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
नागरिकांसाठी महत्त्वाचा संदेश
सायबर गुन्हेगार अशा वेगवेगळ्या युक्त्या वापरून नागरिकांना फसवतात. त्यामुळे अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही कॉलची खात्री करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही सरकारी संस्था किंवा बँक फोनवरून तुमची गोपनीय माहिती किंवा पैशांची मागणी करत नाही. अशा प्रकारचे कॉल आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी आणि कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नये. यामुळे अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करता येऊ शकतो.

error: Content is protected !!