मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. त्यानंतर सरकारने यशस्वीपणे तोडगा काढला. सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर, अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्याच्या सर्व दैनिकांत ‘देवाभाऊ’ अशा मोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. पहिल्या आणि दुसऱ्या पानावर छापलेल्या या जाहिराती निनावी होत्या, ज्यामुळे सोशल मीडियावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. नियमांनुसार, जाहिरात प्रसिद्ध करताना तिचा स्रोत देणे आवश्यक असते, परंतु या जाहिरातींमध्ये कोणताही स्रोत नव्हता. त्यामुळे, ‘या जाहिराती कोणी दिल्या?’ असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत होता.
मित्रपक्षाच्या मंत्र्याने दिल्या जाहिराती: रोहित पवार
या सर्व पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या जाहिराती एका मंत्र्याने दिल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की हा मंत्री भाजपचा नसून मित्रपक्षाचा आहे. त्यामुळे, त्यांनी या जाहिरातींवरील खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये कोठून आले? हा मंत्री कोण?’ असे अनेक प्रश्न निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले आहे. जाहिराती देणारे समोर आल्यास या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘एकिकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना, वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती पाहून चीड आली. परंतु, देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, असा माझा विश्वास होता.’
कोट्यवधी रुपयांचा खर्च कोणी केला?
रोहित पवारांनी पुढे म्हटले आहे, ‘या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता असे समजले की, या जाहिराती देवेंद्र फडणवीस यांना न कळवता सरकारने मित्रपक्षातील एका मंत्र्याने परस्पर दिल्या आहेत. मला मिळालेली माहिती खरी असेल तर, मित्रपक्षाच्या मंत्र्याने मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातींसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.’
रोहित पवारांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. या जाहिराती देणारा अज्ञात मंत्री कोण होता आणि त्यासाठी खर्च केलेले पैसे कोठून आले, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.