अंबाजोगाई बसखाली चिरडून महिला कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
केज येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचा एसटी बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. विजयमाला नानाभाऊ सरवदे (वय ५५) असे या मृत महिलेचे नाव आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
मंगळवारी (दि. २) सकाळी ही घटना घडली. विजयमाला सरवदे रोजच्याप्रमाणे कामावर जाण्यासाठी धारूर आगाराची धारूर-परळी बस (एमएच १५ एमएच २३४७) पकडून आल्या होत्या. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या अंबाजोगाई येथील मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ बसमधून उतरत होत्या. त्याचवेळी, बस पूर्ण थांबल्याची खात्री न करताच बस चालकाने बस पुढे घेतली. त्यामुळे सरवदे बसच्या मागील चाकाखाली आल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नातेवाईकांनी दोषी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.