मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस असून, सरकारने अद्याप तोडगा काढलेला नाही. यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दादाजी स्ट्रीट, फोर्ट परिसरात आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांनी एका कपड्यांच्या दुकानात चोरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांनी स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुकानातील काही कपडे आणि सहा हजार रुपयांची रोकड चोरली. ही घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे.
या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. तक्रारदाराने आपल्या दुकानातील चोरीची माहिती ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांना टॅग केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठा लोकसमर्थन मिळत असताना, अशा काही टवाळखोर तरुणांच्या कृत्यांमुळे या आंदोलनाला गालबोट लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.