सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. भेट झाल्यानंतर सुळे आझाद मैदानावरून त्यांच्या कारकडे निघाल्या होत्या. मात्र मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा-लाख मराठा असी घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी तर खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. या सर्व स्थितीमुळे जरांगे यांच्या आंदोलनाच्या परिसरात काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून दिली आणि त्यांना कारपर्यंत पोहोचवलं.
मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर सुप्रिया सुळे मात्र शांत होत्या. त्यांनी प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने नमस्कार केला. तसेच प्रत्येकाच्या हातात ता मिळवला. सर्वांनाच नमस्कार करून त्या नंतर कारमधून निघून गेल्या. नंतर आंदोलकांनी त्यांच्या कारचाही पाठलाग केला. त्यांच्या कारलाही आंदोलकांनी घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व घडामोडीमुळे सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पण काही आंदोलकांनी भान राखून सुळे यांच्या कारला वाट करून दिली.
मनोज जरांगे वारंवार मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करत आहेत. काहीही झालं तरी तुम्ही आक्रमक होऊ नका. शांत राहा. आपल्याला शांततेत आरक्षण घ्यायचे आहे, असे जरांगे आंदोलकांना सांगत आहेत. मात्र काही आंदोलक आक्रमक होताना दिसत असून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.