ज्यांच्यापासून संरक्षण हवं तेच लांडगे ओबीसींच्या कळपात शिरले तर… लक्ष्मण हाकेंचा मराठा राज्यकर्त्यांवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाला धोका, मनोज जरांगेंच्या आंदोलनामागून सरकार उलथवण्याचा कट: लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र टीका केली आहे. हाके यांनी हे आंदोलन मराठा समाजासाठी नसून, ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, या आंदोलनाच्या आडून सरकार उलथवून टाकण्याचा कट रचला जात असून, यात विरोधी पक्षांसह अजित पवार गटाचे आमदार आणि खासदारही सामील असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणास धोका

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे की, जर मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाली, तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं आरक्षण संपून जाईल. “ओबीसी समाजाला शासनकर्त्या आणि राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळावं म्हणून आरक्षण देण्यात आले. मात्र, ज्या जमातीपासून त्यांना संरक्षण पाहिजे, तेच सगळे लांडगे ओबीसींच्या कळपात घुसले तर मेंढरांचं काय होईल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात ५९ लाख कुणबी प्रमाणपत्रे वाटली गेली असतील तर ओबीसी समाजाचं आरक्षण आधीच संपलेलं आहे, असेही ते म्हणाले.

हा आरक्षणाचा नाही, राजकीय लढा’

हाके यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हे आंदोलन गरीब मराठा बांधवांसाठी किंवा त्यांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी नसून राजकीय कट असल्याचा आरोप केला. जरांगे पाटील यांनी मुंबईकडे येतानाच ‘मी हे सरकार उलथवून टाकणार आहे’ असे वक्तव्य करून आपला राजकीय अजेंडा स्पष्ट केला होता, असे हाके म्हणाले.

अजित पवारांवर गंभीर आरोप

सरकार उलथवण्याच्या कटात विरोधी पक्षांसोबतच अजित पवार गटाचे आमदार आणि खासदारही सामील असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. “मी माझ्या पदरचं काहीही सांगत नाही, मी हे जबाबदारीने सांगत आहे की, मनोज जरांगे यांच्या नावाचा चेहरा वापरून महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदार-खासदार सरकारला अस्वस्थ करण्याचा आणि बदलण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे हाके यांनी म्हटले आहे.

ओबीसींचा संघर्ष सुरूच राहणार

ओबीसी समाज शांत आहे, याचा अर्थ त्याचे आरक्षण संपवून टाकायचं असा होत नाही. जर राज्य सरकारला झुंडशाहीची भाषा समजत असेल तर आम्हीही संघर्ष यात्रा आणि मोर्चे काढू, असा इशारा हाके यांनी दिला. ओबीसी समाज एकत्र आणणे अवघड असले, तरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या या समाजाचं आरक्षण संपू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी भविष्यात आंदोलने आणि संघर्ष यात्रा काढण्याची घोषणाही केली आहे.

error: Content is protected !!