लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली; मनोज जरांगेंवर टीका अन् आमदारकीला उभे राहण्याची तयारी….

राज्यात मराठा आरक्षण आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलं असून बीडमध्येही त्याचे पडसाद उमटले. बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या कारवर दगडफेक झाल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली. विजयसिंह पंडित यांच्यावर बोलताना लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली आणि त्यांनी शिवीगाळ केली. वेळ पडली तर गेवराईमध्ये जाऊन आमदारकी लढवणार असंही हाके म्हणाले.

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली. बीडच्या गेवराईमध्ये शिवाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले. याच चौकात जरांगेंच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आलं होतं, त्यावरून हा वाद झाला. त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे आणि विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्रीच सुरक्षित नाहीत
लक्ष्मण हाके म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना गेल्या चार दिवसांपासून शिव्या दिल्या जात आहेत, तो महाराष्ट्राचा अपमान आहे. या राज्यात मुख्यमंत्रीच सुरक्षित नाहीत असा आमचा समज आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसींची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्यावर असा जर हल्ला होत असेल तर गावगाड्यातील सर्वसामान्य लोकांचं काय?”

लक्ष्मण हाके म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिलं आहे. पण यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे. याचा अर्थ ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही. आम्ही सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहोत, आमच्या आरक्षणाशिवाय तुम्ही काहीही घ्या. राज्यातील 58 लाख कुणबींच्या नोंदींमुळे ओबीसींचे आरक्षण संपलं आहे असा माझा दावा आहे.”

विजयसिंह पंडितांना आव्हान
अजित पवार आणि विजयसिंह पंडित यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी आक्षेपार्ह टीका केल्यानंतर त्याला पंडित यांनी उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी हाके यांना श्वानाची उपमा दिली. विजयसिंह पंडित यांच्या या टीकेला उत्तर देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “आम्ही भटकेच आहोत. पण तुला पिढ्यानपिढ्या मतदान करुन आम्ही आमदार केलं. त्याने मनोज जरांगेला पाठिंबा दिला. संविधानाचा भंग केला असून त्याची आमदारकी रद्द करा. वेळ आली तर गेवराईमध्ये जाऊन आमदारकीला उभा राहणार.”

यावेळी लक्ष्मण हाके यांनी शरद पवार आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्यावरही टीका केली. एकीकडे शरद पवार हे मंडल यात्रा काढत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे खासदार बजरंग सोनवणे हे मनोज जरांगे यांना पाठिंबा देतात हा विरोधाभास असल्याचं हाके म्हणाले.

error: Content is protected !!