बीड:बीड जिल्ह्याच्या वडवणी न्यायालयातील सरकारी वकील विनायक चंदेल यांच्या आत्महत्येमुळे न्यायवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी मिळालेल्या चिठ्ठीच्या आणि कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे वडवणी पोलिसांनी न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर संबंधित न्यायाधीशांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
वडवणी येथील न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेले विनायक चंदेल यांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये तसेच चंदेल यांच्या मुलाने, विश्वजित चंदेल यांनी दिलेल्या फिर्यादीत न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळूनच विनायक चंदेल यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
न्यायाधीशांविरोधात प्रथमच गुन्हा
एका न्यायाधीशावर थेट आत्महत्येसारख्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही दुर्मिळ घटना आहे. यापूर्वी साताऱ्यात एका न्यायाधीशावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र, मृत्यूला जबाबदार धरून गुन्हा दाखल होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, न्यायालयीन वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुढील तपास सुरू
चंदेल कुटुंबीयांच्या मागणीनुसार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपी न्यायाधीश रफिक शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलीस आरोपी न्यायाधीशांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी चंदेल कुटुंबीयांनी केली आहे.