बीड जिल्हा परिषदेच्या ६1 गटांची आणि जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील १२२ गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर



बीड, दि. २२ (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारी एक महत्त्वाची घडामोड म्हणून जिल्हा परिषदेच्या ६९ गटांची आणि जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील १२२ गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने १४ जुलै रोजी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती आणि आक्षेपांवर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासमोर सुनावणी पार पडल्यानंतर ही अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अंतिम प्रभाग रचनेत केज तालुक्यात लक्षणीय बदल दिसून आले आहेत. आगामी निवडणुका विचारात घेता, आता केज तालुक्यात जिल्हा परिषदेचे ८ गट आणि पंचायत समितीचे १६ गण असणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत केज तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ गट आणि पंचायत समितीचे १४ गण होते. हरकतींच्या सुनावणीत काही महत्त्वाचे बदल स्वीकारले गेले आहेत.

या बदलांनुसार, आडस गटातील तांबवा गणात पूर्वी युसूफवडगाव गटात प्रस्तावित असलेल्या भाटूंबा गावाचा समावेश करण्यात आला आहे, तर या गणातील प्रस्तावित ठाकेफळ हे गाव वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, होळ जिल्हा परिषद गटातील होळ गणामध्ये पूर्वी युसूफवडगाव गटात प्रस्तावित असलेले सावळेश्वर हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.

या प्रक्रियेत युसूफवडगाव गटातून भाटूंबा आणि सावळेश्वर ही गावे वगळून, त्या गटात आता ठाकेफळ हे गाव समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रभाग रचनेतील बदलांचा परिणाम त्या-त्या गटांमधील सामाजिक आरक्षणावरही होण्याची शक्यता आहे. या अंतिम रचनेमुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

error: Content is protected !!