15 ऑगस्ट पर्यंत `हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता, या मोहिमेत श्रमदानाचा व लोकसहभागाचा उत्सव!
सीईओ जितिन रहमान यांचे नागरिकांना आवाहन



बीड दि.9 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात 79 व्या  स्वातंत्र्य दिनानिमित्ताने   हर घर तिरंगा   ही मोहिम राबविण्यात येत आहे.  या निमित्ताने पाणी व स्वच्छता या  उपक्रमात  श्रमदानाचा व लोक  सहभागाचा उत्सव प्रत्येक गावात घ्यायचा  आहे.  त्यासाठी  ‘हर घर तिरंगा  हर घर स्वच्छता` ही मोहिम  `स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संग` या घोषवाक्य अंतर्गत  केंद्र शासनाचा पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यामाने दि.8   ते दि. 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी केले.
         जिल्ह्यातील या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, उपअभियंता तसेच गट व समूह समन्वयक यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता”  या मोहिमेची संकल्पना लोकसहभागातील  उत्सव व ग्रामस्थांच्या एकात्मतेच्या भावनेवर आधारित आहे. ज्यामध्ये स्वातंत्र्याचा सार स्वच्छता व सुजलता या संकल्पनेशी जोडली गेली आहे. देशाचे पंतप्रधान यांची संकल्पना बळकट करण्यासाठी ग्रामीण भागात, स्वच्छ पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता व आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी WASH (पाणी, स्वच्छता आणि आरोग्य) या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.  या मोहिमेचा जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर दिनांक 08 ऑगस्ट रोजी शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व गावात  स्वच्छ सुजल गाव करण्याबाबतची प्रतिज्ञा गावातील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी घेणार आहेत. दि. 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.  यामध्ये  सार्वजनिक ठिकाणे, जलकुंभ, पाणी आणि स्वच्छता सुविधांची स्वच्छता करणे. गावातील विद्यार्थी, युवक, यांची स्वच्छता रॅली, वैयक्तिक घरगुती स्तरावर रांगोळी काढणे व स्वच्छता घटकांना रंगकाम करणे. नाल्यांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याची गळती शोधणे व थांबवणे.  सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, प्लास्टीक व्यवस्थापन केंद्र परिसरासह इतर सार्वजनिक ठिकणी स्वच्छता मोहिम राबवणे. प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवून त्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित तपासणी करणे. सार्वजनिक स्वच्छताः “आझादी का श्रमदान” ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून सार्वजनिक ठिकाणासह रस्त्यांवर साफसफाई करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दि. 12 ऑगस्ट : WASH पायाभूत सुविधा स्वच्छता दिन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पायाभूत सुविधांची स्वच्छता व सुशोभीकरणावर विशेष देण्यात येणार आहे. देशभक्तीपर थीमसह पाणी आणि स्वच्छता स्थळांचे रंगकाम आणि सजावट करणे व WASH पायाभुत घटकांवर तिरंगी धागे बांधणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत कळविण्यात आले आहे.  असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे.
       दि. 13 ऑगस्ट रोजी स्वच्छता संवाद आणि जागरूकता दिन म्हणुन साजरा करण्यात येणार असुन कचरा व्यवस्थापन तांत्रिक प्रात्यक्षिक (वर्गीकरण, कंपोस्टिंग) व शौचालय देखभाल,  जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण, जलस्रोत संरक्षण, एकल वापराचे प्लास्टिक टाळणे इत्यादींबाबत जनजागृती करणे. ग्रामस्थांद्वारे वैयक्तिक शौचालय स्वच्छता उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दि.14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची तयारी यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाण, रस्ते, चौक, बाजारपेठा, आदी स्थळांची अंतिम स्वच्छता व सजावट आणि ध्वजारोहणासाठी ठिकाण निश्चित करण्यात येतील.  दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छता चॅम्पियन आणि स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
       जिल्ह्यातील 934 गावांमध्ये  अनेक दिवसापासून पडलेले प्लास्टिक जमा करण्यासाठी विशेष श्रमदान मोहीम होणार असून यात जमा झालेल्या प्लास्टिक कचरा वर्गीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात येणार आहे. या सर्व जमा झालेल्या प्लास्टिकचे पुनर्वापर करण्याबाबत नियोजन केले.  असून भविष्यात प्लास्टिक होणार नाही यासाठी विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच खतखड्डा भरू आपले गाव स्वच्छ करू या उपक्रमात देखील भरलेल्या खतखड्यां मधून  जैविक खत निर्मिती होईल असे नियोजन केले आहे.  बचत गटाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम शाश्वत स्वरूपात करण्यासाठी देखील ग्रामपंचायतीनी पुढाकार घेतला आहे.

error: Content is protected !!