बीड दि. १७: बीड जिल्ह्यात गाजलेल्या आणि जनतेच्या संतापाला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवरील विनयभंग प्रकरणात अटकेत असलेल्या विजय पवार व प्रशांत खाटोकर ( उमाकिरण संकुल, बीड) या दोन आरोपींना गुरुवारी, १७ जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती शिंदे यांनी जामीन मंजूर केला आहे.
या गुन्ह्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली होती. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिचे अश्लील फोटो काढून विनयभंग केल्याचा आरोप होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.
आज जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांना ॲड. गणेश कोल्हे, ॲड. संज्योत महाजन, ॲड. योगेश सुरवसे, ॲड. अभिजीत चीरे, ॲड. धनराज जाधव व ॲड. सोनवणे यांनी सहकार्य केले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, प्रकरणाची पुढील सुनावणी आणि निकाल काय लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.