बीड दि.16 (प्रतिनिधी):
दिनांक 16/07/2025 रोजी गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राक्षसभुवन परिसरातील गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टरद्वारे बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार चकलांबा पोलिसांनी दि.16 जुलै रोजी धाड टाकली. यांमध्ये सुमारे 5 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले. पोलीस पथकाने नदीपात्रात जाऊन घटनास्थळी छापा टाकला असता, एक ट्रॅक्टर रेतीसह मिळून आले. ट्रॅक्टर चालकास घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत रुपये 5,60,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये ट्रॅक्टरसह रेतीचा समावेश आहे.
याप्रकरणी आरोपी जमीर आरिफ शेख (वय 21 वर्ष), रा. राक्षसभुवन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, पोलीस अंमलदार वंजारे, पो.कॉ. कैलास खटाने, प्रशांत घोंगडे, हनुमान इंगोले यांनी केली आहे.