आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने दुचाकीस्वाराला धडक; एकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर-पुणे महामार्गावर एका भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. नितीन शेळके (रा. जातेगाव फाटा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर-पुणे महामार्गावर रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास हा अपघात झाला. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस त्याच्या चारचाकी वाहनाने जात असताना जातेगाव फाट्याकडून येणाऱ्या नितीन शेळके यांच्या दुचाकीला त्याने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत नितीन शेळके यांचा चुलत भाऊ स्वप्नील शेळके यांनी सुपा पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, नितीन शेळके हे हिरो कंपनीच्या मोटारसायकलने जातेगाव फाटा येथे नगर-पुणे रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी एमजी कंपनीची भरधाव वेगातील कार त्यांच्या दुचाकीला डाव्या बाजूने धडकली. अपघातानंतर नितीन शेळके यांना तात्काळ निरामय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शवविच्छेदनानंतर नितीन शेळके यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!