बीडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणी अटकेत असलेल्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षक आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांना बीड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने हा आदेश दिला. यापूर्वी त्यांना अनुक्रमे दोन आणि पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, जी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये पीडितेच्या मैत्रिणी, कुटुंबीय आणि क्लासमधील काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी प्रशांत खाटोकरची दुचाकी, तसेच दोन्ही आरोपींचे मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. क्लासमधील ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर देखील जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले लॅपटॉप, मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पुढील तपासासाठी पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीडमधील या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.