उमाकिरण शैक्षणिक संकुल प्रकरणार: धनंजय मुंडे यांच्या आरोपांवर आमदार संदीप क्षीरसागर यांचे पलटवार

बीड विनयभंग प्रकरण: मुंडे-क्षीरसागर यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप; SIT चौकशीची मागणी
बीड शहरातील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ झाल्याच्या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच विजय पवारला आमदार क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केले होते.

धनंजय मुंडेंचे गंभीर आरोप
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर थेट आरोप केले आहेत. विजय पवारविरुद्ध गुन्हा दाखल झाला, त्याच रात्री तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता, असा दावा मुंडे यांनी केला. तसेच, त्यानंतरच्या दोन दिवसांत पीडितेच्या वडिलांना २० फोन करण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

संदीप क्षीरसागरांचे प्रत्युत्तर
धनंजय मुंडे यांच्या आरोपांवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले आहे. क्षीरसागर म्हणाले की, धनंजय मुंडेंनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे आणि त्याला आपली पूर्ण सहमती आहे. “जो प्रकार घडला तो चुकीचा घडला आहे. गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शिक्षकांना अटक झाली आहे. प्रशासनासोबत आम्ही चर्चा करत आहोत, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे,” असे त्यांनी सांगितले.

क्षीरसागर पुढे म्हणाले, “ते (आरोपी) माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे-पुढे बघू नका, असं मी पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करायला १० दिवस लागले नाहीत. माझ्या जवळचे असले तरी पीडितेने तक्रार देताच गुन्हा दाखल झाला आहे. मी काही त्यांच्यासारखं १५० दिवस पळून गेलो नाही.”

धनंजय मुंडेंच्या ‘मस्साजोग’ प्रकरणाचा संदर्भ देत क्षीरसागर यांनी टीका केली. “त्यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांना दुःख आहे. ते या प्रकरणात बोलताय तसेच मस्साजोग प्रकरणी त्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता,” असे क्षीरसागर म्हणाले.

पुढील कारवाई आणि राजकीय भूमिका
संदीप क्षीरसागर यांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे समर्थन केले. “मी आता बोलण्यापेक्षा सत्तेत मुंडे साहेब आहेत, त्यांनी जोर लावला पाहिजे,” असे ते म्हणाले. मस्साजोग प्रकरणी मुंडे यांना १५० दिवस बाहेर राहावे लागल्याने त्यांना दुःख आहे, असेही त्यांनी नमूद केले. लोकप्रतिनिधी म्हणून आपण रोज रस्त्यावर काम करत असतो, चहाच्या टपरीवर जातो, तिथे लोक भेटतात. संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत. पीडितेकडे जाण्याचा माझा विचार होता, मात्र आताच जाणं योग्य नाही, त्यामुळे तिथे गेलो नाही, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, SIT चौकशीनंतर काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

error: Content is protected !!