बीड – उमाकिरण शैक्षणिक संकुलातील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने जिल्ह्यात संतापाची लाट उसळवली असताना, या गंभीर घटनेवर आमदार धनंजय मुंडे यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे.
या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज आमदार मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि तपास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत चौकशीचा आढावा घेतला.
मुंडे यांनी यावेळी सांगितले की, “अनेक पालकांनी दबक्या आवाजात हे आरोपी पूर्वीही अशा घृणास्पद प्रकारात गुंतल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल तपासणी आवश्यक आहे.”
त्यामुळे मुंडेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे की, या प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) ने करून दोषींना आणि मदत करणाऱ्यांनाही कठोर शिक्षा व्हावी.
या मागणीमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, सर्वसामान्यांमध्ये या प्रकरणाचा योग्य न्याय होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.