ज्येष्ठ संत ज्ञानेश्वर दादा माऊलींच्या पुण्यतिथी सोहळ्यात उसळली भाविकांची अलोट गर्दी, चाकरवाडीत ‘मिनी कुंभमेळ्या’चा अनुभव!
बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभूती ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या २५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे, ज्यामुळे या ठिकाणाला ‘मिनी कुंभमेळ्या’चे स्वरूप आले आहे. या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना प्रकाश महाराज बोधले म्हणाले की, “विसाव्या शतकातील महान संत विभूती ज्ञानेश्वर दादा माऊली यांनी लोकोद्धाराचे कार्य केले. त्यामुळेच आज श्रीक्षेत्र चाकरवाडीत हा मिनी कुंभमेळा भरला आहे. संतांच्या आशीर्वादाची शिदोरी आयुष्यभर कधीही सरत नाही.” याप्रसंगी महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत महादेव महाराज चाकरवाडीकर, ह.भ.प. नारायण भाऊ उत्तरेश्वर पिंपरीकर, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू, ह.भ.प. नाना महाराज कदम, ह.भ.प. सुरेश महाराज जाधव, ह.भ.प. गणेश महाराज जोगदंड, ह.भ.प. हरिदास भाऊ जोगदंड, शिवानंद महाराज गिरी यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
—
संतांच्या कृपेनेच भवसागर पार
प्रकाश महाराज बोधले यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥ नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥ तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥३॥’ या अभंगावर सखोल चिंतन मांडले. महाराज पुढे म्हणाले, “मराठवाड्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य दादा माऊलींनी मोठ्या प्रमाणात केले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसामान्यांच्या उद्धारासाठी वेचले, म्हणूनच आज हा वैभवशाली सोहळा संपन्न होत आहे.”
ते म्हणाले, “जगातील प्रत्येक माणूस स्वार्थी असतो, आजपर्यंत कोणताही पूर्णपणे त्यागी माणूस जन्माला आलेला नाही. संतही मागतात, देवही मागतो आणि जीवही मागतो. प्रत्येकाची मागणी वेगवेगळी असते. संत ब्रम्हज्ञान किंवा आत्मस्थिती नव्हे, तर साधू भक्ती आणि प्रेम मागतात. जर परमार्थ चांगला सुरू असेल, तर देव संसारातील काही गोष्टी अनुकूल करतो आणि जीव त्यात अडकतो.”
— आशीर्वादाची शक्ती
महाराज बोधले यांनी कीर्तनात सांगितले की, “या अभंगात जगद्गुरू तुकाराम महाराज संतांकडे आशीर्वाद मागतात. राजाकडे वैभव मागावे, पण संतांकडे आशीर्वाद मागावा. आशीर्वादामध्ये खूप मोठी ताकद असते. प्रतिज्ञा ही शक्तीने केली जाते, तर आशीर्वाद हा देणाऱ्याच्या अंतःकरणातील समाधानाचा भाव असतो.” तुकाराम महाराज संतांच्या दासांचा दास होण्याची मागणी करतात आणि भक्ती काय आहे, हे संतांनीच सांगितले पाहिजे कारण संत ते अनुभवाला आणून देतात. आपल्याला भक्ती कशी करावी, हे माऊलींच्या पुण्यतिथी उत्सवातून कळते. संतांच्या पायांच्या आधारानेच भव नदी तरून जाता येते, असे महाराज म्हणाले.
या कीर्तनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक राम महाराज काजळे, गायनाचार्य बिबीशन महाराज कोकाटे, ओंकार महाराज जगताप, अभिमान महाराज ढाकणे, विष्णु महाराज, संजय महाराज देवकर, माऊली महाराज आवटे यांच्यासह शेकडो टाळकरी मंडळींनी साथसंगत केली.