बीड दि.24(प्रतिनिधी):
धारूर तालुक्यात कोयाळ गावात झोपेतच सख्या बहिण-भावाला सर्पदंश झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्पदंशामुळे सख्या बहिण भावाचा झोपेतच मृत्यू झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त येत आहे.
कोमल मुंडे (वय 15) आणि शिवम मुंडे (वय 12) असे मृत बहिण भावाचे नाव आहे. गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे जीवाला धोका निर्माण झालाय. प्रशासनानं नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात झोपेतच सर्पदंश झाल्याने सख्या बहिण भावाचा मृत्यू झालाय. ही घटना 24 मे रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली. सख्खे बहिण-भाऊ घरात झोपलेले होते. रात्री उशिरा त्यांना सर्पदंश झाला. सुरुवातीला दोघांनाही काही समजले नाही, परंतु त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचेपर्यंत दोघांचीही प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
गेल्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर आहे. या वातावरणामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची हालचाल वाढली असून सर्पदंशाच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागात झोपडी किंवा खुल्या जागेत झोपणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारांमुळे जिवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घराजवळील जागा स्वच्छ ठेवणे, उंदीर-सरपटणाऱ्या प्राण्यांची वावर होणार नाही याची खबरदारी घेणे, रात्री झोपताना झोपेची जागा नीट पाहणे आणि शक्य असल्यास झोपण्यासाठी उंचावलेली बेड वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.