सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने खळबळ


वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का, अज्ञात कारणांमुळे घेतले टोकाचे पाऊल

सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मोदी परिसरातील त्यांच्या राहत्या घरी रात्री ८.३० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, दोन फायरिंगच्या आवाजानंतर एक गोळी त्यांच्या डोक्याच्या आरपार गेली.

गोळीचा आवाज ऐकताच घरातील सदस्य व शेजारी धावून आले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या डॉ. वळसंगकर यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली. त्यांच्या निधनाने संपूर्ण सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्र शोकाकुल झाले आहे.

हजारो रुग्णांचे जीव वाचवलेल्या डॉक्टरने घेतले टोकाचे पाऊल
डॉ. वळसंगकर हे केवळ सोलापुरातच नव्हे, तर महाराष्ट्र आणि जगभरातील अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा बजावणारे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांच्या उपचाराने हजारो रुग्णांना जीवनदान मिळाले, मात्र त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच वळसंगकर हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे नातेवाईक आणि सहकारी डॉक्टरांनी मोठी गर्दी केली. हॉस्पिटलमधील वातावरण शोकमय झाले असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

error: Content is protected !!