बीड:
मारहाण, सोने, पैशांची उधळण आणि शिकारीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला सतीश ऊर्फ खोक्या भोसले याला बीडच्या गुन्हे शाखेने गुरुवारी प्रयागराजमधून ताब्यात घेतले. त्याला प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने ४८ तासांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली. खोक्याला (१४ मार्च) विमानाने पुण्याला आणल्यानंतर तेथून पोलिस वाहनाने बीडमध्ये आणले जाणार आहे. शुक्रवारी त्याला बीड न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.
मारहाणीचा गुन्हा चकलांबा पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. खोक्याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीएसआय कुलकर्णी यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. हा प्रकार तिंतरवणी गावात घडला असून हे गाव चकलांबा पोलिसांच्या हद्दीत येते. त्यामुळे हा गुन्हा चकलांबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.