धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण

धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामुळे त्यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, आज दादासाहेब खिंडकर यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांना अटक करून पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात दादासाहेब खिंडकर यांच्यावर कलम 307, अपहरण, कट रचणे यासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात दादासाहेब खिंडकर यांच्यासह इतर आरोपींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, दादासाहेब खिंडकर हे मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू आहेत.

धनंजय देशमुख यांच्या प्रत्येक आंदोलनात दादासाहेब खिंडकर सक्रिय सहभागी असत. मात्र, एका तरुणाला अमानुष मारहाण केल्यामुळे त्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 13 जानेवारी रोजी धनंजय देशमुखांनी मस्साजोग येथे टाकीवर चढून आंदोलन केले होते, त्यावेळीही दादासाहेब खिंडकर त्यांच्यासोबत होते. दादासाहेब खिंडकर हे बीडमधील बाभुळवाडी गावचे सरपंच आहेत. त्यांच्या टोळीकडून एका युवकाला पाईप, काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्याशी संबंधित आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाच ते सात तरुण काठ्या, तलवारी आणि इतर हत्यारे घेऊन एका जीपवर हल्ला करताना दिसत आहेत. तसेच, दोन ते तीन जण भिंतीवरून पहिल्या मजल्यावर चढताना दिसत आहेत. या घटनेतही दादासाहेब खिंडकर सहभागी असल्याचे सांगण्यात येत असले तरी, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दादासाहेब खिंडकर यांच्याविरोधात तब्बल १२ गुन्हे

यामध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात ६, बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४ आणि पेठबीड पोलीस ठाण्यात २ गुन्ह्यांचा समावेश आहे. शासकीय नौकरावर जिवघेणा हल्ला करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यात अडवून लुट करणे अशा गंभीर गुन्ह्यांचा यात समावेश आहे.

error: Content is protected !!