सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज: “स्वतः समोर या, खोका बोका चोखा सगळे सापडतील!


संतोष देशमुख यांच्या मारहाणीच्या पाशवी दृश्यांमुळे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या आठवड्याभरात त्यांचे बंधू अजय मुंडे राजकीय मैदानात उतरले. खोक्या प्रकरणावरून सुरेश धस यांच्यावर टीका करत, अजय मुंडेंनी त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, आज (12 मार्च) सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराज येथे अटक करण्यात आली. खोक्या हा सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे बोलले जाते. खोक्याच्या अटकेनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “कायद्याच्या चौकटीत त्याच्यावर कारवाई होईल. मी आधीच म्हटलं होतं, चूक केली असेल तर कारवाई करा. त्याच्यावर लागलेल्या कलमानुसार पोलीस पुढील कारवाई करतील.”

अजय मुंडेंना प्रत्युत्तर

अजय मुंडेंच्या आरोपांवर सुरेश धस यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं, “अजय मुंडे अजून लहान आहे. त्याच्यावर मी बोलणार नाही. मात्र, धनंजय मुंडेंनी याला त्याला बोलवण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोलावं. खोका, बोका, चोखा सगळे सापडतील,” असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना थेट ओपन चॅलेंज दिलं.

मागील वाद आणि टीका

काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी “माझा कट्टा” या मुलाखतीत धनंजय मुंडेंवर टीका करताना त्यांच्या कुटुंबातील अंतर्गत वादांवर भाष्य केलं होतं. यावर अजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत, धनंजय मुंडेंची पाठराखण केली.

error: Content is protected !!