सुरेश धस यांच्यानंतर संदीप क्षीरसागर अडचणीत, कार्यकर्त्याकडून शोरुमच्या मॅनेजरला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल



बीडमधून आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण केल्याचे दिसत आहे. या घटनेत आमदार क्षीरसागर यांच्या पीएचा देखील सहभाग असल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे ही घटना आता सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या या घटनेत जयमल्हार बागल, सतीश शेळके, आणि गणेश भरणारे या कार्यकर्त्यांनी मॅनेजरला मारहाण केली. विशेष म्हणजे, आमदार क्षीरसागर यांचे पीए स्वतः शोरूममध्ये जाऊन मारहाण करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे.

या घटनेनंतरही जिल्हा परिषदेच्या सीईओच्या हस्तक्षेपामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. राजकीय दबावामुळे पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे. सीसीटीव्ही फुटेज असूनही आरोपींवर कारवाई का होत नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

बीडमध्ये सत्ताधारी नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून खुलेआम गुंडगिरी होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेने लोकशाहीत सामान्य नागरिकांना न्याय मिळेल का, असा प्रश्नही विचारला जात आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!