प्रसिद्ध यूट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादियाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या असून, या प्रकरणी शुक्रवारी (७ मार्च) गुवाहाटी पोलिसांनी त्याची चौकशी केली. गुरुवारी रात्रीच रणवीर चौकशीसाठी आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचला आणि गुन्हे शाखेसमोर हजर झाला. शुक्रवारी अनेक तास चौकशी झाली, ज्यावेळी त्याचा वकीलही उपस्थित होता.
दरम्यान, रणवीर अलाहाबादियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुवाहाटी पोलिस त्याला चौकशीसाठी नेताना दिसत आहेत. पांढऱ्या शर्टामध्ये असलेल्या रणवीरला दोन्ही हात पकडून पायऱ्यांवरून नेत असल्याचे दृश्य पाहून लोकांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
४ तासांहून अधिक चौकशी
रणवीरची चौकशी करणाऱ्या पोलिस समितीचे नेतृत्व सहआयुक्त अंकुर जैन यांनी केले. त्यांनी माध्यमांना सांगितले की, “रणवीर दुपारी १२:३० वाजता गुन्हे शाखा कार्यालयात पोहोचला आणि चौकशी चार तासांपेक्षा अधिक काळ चालली. त्याने चौकशीत पूर्ण सहकार्य केले आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.”
पुढील तपास सुरूच
रणवीरने पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तपास सुरू असून, अद्याप चार जणांचे जबाब घेणे बाकी आहे. या शोचे तीन स्पर्धक देशाबाहेर असल्याने हजर झालेले नाहीत. पोलिसांनी त्यांना मेल पाठवले असून, लवकरच पुढील नोटीस पाठवून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात पाच यूट्यूबर्स आणि शोचे शूटिंग ज्या ठिकाणी झाले त्याच्या मालकांची नावेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहेत.