बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पाव किलो वजनाचे दोन दगड (Stone) पडल्याचा प्रकार समोर आला आहे. एक दगड शेतकऱ्याच्या घरावर पडल्यानंतर पत्र्याला छिद्र पडून तो थेट घरात आल्याचे दिसून आले. तर दुसरा दगड शेतकऱ्यांच्या घरा शेजारील गायरान जागेत आढळून आला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही दगड अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहेत.
लिमगाव येथील शेतकरी भिकाजी ज्ञानोबा अंबुरे यांच्या घरावर सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. आपल्या घरावरील पत्र्यावर नेमका आवाज कशाचा आला हे पाहण्यासाठी परिसरात शेतकऱ्यांनी शोधाशोध केली. घरात गेल्यानंतर घरावरील पत्र्याला मोठे छिद्र पडल्याचे दिसून आले. त्यावेळी, घरात इतरत्र ठिकाणी पाहणी केली असता पाव किलो वजनाचा काळ्या रंगाचा एक दगड आढळून आला आहे. विशेष म्हणजे, दुपारी त्याचवेळेस घराशेजारील मोकळ्या गायरान जागेत देखील पाव किलो वजनाचा आणखी एक काळ्या रंगाचा दगड आढळून आला. त्यामुळे, या शेतकऱ्यासह स्थानिकांचे कुतूहल वाढले. त्यानंतर, शेतकऱ्याने संबंधित दगडासंदर्भात ग्रामपंचायत व तहसील प्रशासनाला कळवले होते. दरम्यान, तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही दगडांचा पंचनामा केला असून हे दगड छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहे. या अभ्यासकांनी गावाला भेट देऊन संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात घेतले आहेत.