भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे काही संवाद राजकारणात कायम चर्चेचा विषय ठरतात. त्यांच्या वक्तव्यांमध्ये गावरान थेटपणा असतो आणि त्यामुळे ते अनेकदा चर्चेत येतात. त्यांच्या शाब्दिक फटकाऱ्याने अनेक घायाळ होतात, तर काही वेळा वादही निर्माण होतात. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
“कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील”
रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात मोठा दावा केला. आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव सेनेचे अस्तित्व संपेल, असा त्यांनी अंदाज वर्तवला.
“आपली पक्षसंघटना इतकी मजबूत आहे की, कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील,” असे वक्तव्य त्यांनी भाजपच्या कार्यशाळेत केले.
अब्दुल सत्तार यांच्यावरही साधला निशाणा
रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. “सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघातील जनता सत्तार यांच्या वर्तणुकीमुळे नाराज आहे. त्यांनी विशिष्ट विचारधारेला प्रोत्साहन देत सरकारी योजनांचा लाभ फक्त काही लोकांना दिला,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, “सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती आहे,” असे वादग्रस्त विधान करत त्यांनी सत्तारांवर गंभीर टीका केली. “मंत्रीपदाच्या काळात केलेल्या भानगडींमुळेच त्यांना पद गमवावे लागले,” असा टोला दानवे यांनी लगावला.