बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेला दोन महिने झाले आहेत, आणि या हत्येनंतर राज्यात वातावरण तापलं आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दमानिया यांच्यासोबतच भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील आक्रमक आहेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
मात्र, आता अंजली दमानिया यांनी सुरेश धस यांच्यावरच आरोप केले आहेत, ज्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दमानिया यांनी विचारलं की, “सुरेश धस यांनी अचानक युटर्न का घेतला?” त्यांनी असा दावा केला की सुरेश धस यांच्या भूमिका अचानक बदलल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन-तीन दिवसांपूर्वी सुरेश धस बावनकुळेंच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेटले होते, आणि त्यानंतर त्यांच्या वक्तव्यांमध्ये बदल आला आहे.
दमानिया यांनी आणखी आरोप केला की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता, पण तो राजीनामा होऊ शकला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, फडणवीस त्यांना वाचवत आहेत असं स्पष्ट दिसत आहे. त्यांनी असा इशारा दिला की, येत्या दोन-तीन दिवसांत आणखी मोठे खुलासे करतील आणि त्यानंतर नेमकं चित्र स्पष्ट होईल. या विरोधात ठोस कारवाई करण्यासाठी तयारी सुरू असल्याचं दमानिया यांनी सांगितलं.