राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या गळाला?

मुंबई, 10 ऑगस्ट : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. पण राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

नवाब मलिक यांनी ट्वीट करून या प्रकारावर खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अश्या बातम्या पेरल्या गेल्या आहे. पण, ही निव्वळ अफवा आहे. राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार भाजपच्या गळाला लागलेले नाही, अशी माहिती मलिक यांनी दिली.

तसंच, विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीतून अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले होते. आता हेच नेते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे. या नेत्यांना परत पक्षात घ्यायचे की नाही, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबद्दल निर्णय घेऊन घोषणा केली जाईल, असंही मलिक यांनी सांगितले आहे.

राज्यात नोव्हेंबरमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’?

विशेष म्हणजे,  महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे दिवाळीनंतर दिवाळे काढण्याचा प्लॅन भारतीय जनता पक्षाने आखला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तापालट करण्याकरिता भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी तयारी करत आहे, अशी माहिती पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तापलट करण्यात रस नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. कर्नाटक त्यानंतर मध्यप्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तापालट करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, राजस्थानमध्ये भाजपचा डाव फसला.

महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे  दिल्ली दरबारी नियोजन सुरू झाले आहे. जुलै महिन्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळपास पन्नास मिनिटे चर्चा केली त्यानंतर अमित शहा यांनी फडणवीस यांना जेवणासाठी आमंत्रण दिले.

अमित शहा यांच्या डिनर डिप्लोमसी मागे राज्यातील महाविकास आघाडीला सुरूंग लावण्याची नियोजन तर नाही ना? असा प्रश्न दिल्लीतील राजकीय गल्लीमध्ये उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!