मस्साजोग हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, बीड ही केवळ गुन्हेगारी घटनांसाठी ओळखली जाणारी जागा नाही. या जिल्ह्यातून अनेक प्रतिभावान व्यक्ती उभे राहिले आहेत. जसे की, खो-खो खेळाडू प्रियांकाने वर्ल्ड कप जिंकून बीडचे नाव उंचावले आहे. अशा अनेक उदाहरणांमुळे बीडची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. दुर्दैवत म्हणजे, काही लोक या सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून जिल्ह्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवडी गावची कन्या दामिनी दिलीप देशमुख यांनी आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या दामिनी देशमुख यांना प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात कर्तव्यपथावर ध्वजारोहणानंतर होणाऱ्या पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या ऐतिहासिक प्रसंगासाठी निवड होणे हे दामिनी देशमुख आणि संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
दामिनी देशमुख यांच्या यशाने संपूर्ण जिल्ह्यात उत्साह व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या उपलब्धीने तरुण पिढीला देशसेवेकडे प्रेरित करणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.