बीड डी.20 (प्रतिनिधी):
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत ‘उमेद’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शनामुळे आनंद मिळाला आहे. या प्रदर्शनामध्ये बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि खाद्य संस्कृतीमुळे मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन ट्रांजिक्शन झाले. सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून यशस्वी स्रोत मिळाला आहे. उमेदच्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात 23 लाख 87 हजार रुपयांची विक्री झाली यामुळे मिनी सरस प्रदर्शन यशस्वी झाले आहे. यामुळे आनंदाची भावना निर्माण झाली, असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास विभागाच्या उमेद अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शनात समारोप प्रसंगी बचतगटांच्या विक्रीचा उच्चांक केलेल्या बचतगट महिलांच्या सत्कार प्रसंगी सीईओ आदित्य जीवने बोलत होते. प्रकल्प संचालिका श्रीमती संगीतादेवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सीईओ आदित्य जीवने म्हणाले हे बचत गटाचे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन यशस्वी होण्यामागे 360 दिवसाची मेहनत आहे या प्रदर्शनाला मिळालेल्या यशामुळे एक मोठा यशस्वी टप्पा संपन्न झाला आहे. उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे. बीड आणि मराठवाडा विभागातील खाद्य संस्कृती, कला संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले आहे. या प्रदर्शनामध्ये आपण उद्घाटन, मध्यंतरीच्या भेटी आणि समारोपाच्या उपस्थितीमुळे येथील बचत गटाच्या सर्व महिला, कुटुंब, मुले आनंदी झाले. त्यांचं हास्य पाहण्याचा योग आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद मिळाला, कार्यक्रम यशस्वी होण्या पाठीमागे प्रचंड मेहनत आणि परिश्रम असल्याचा आवर्जून उल्लेख करून त्यांनी डी आर टी एम चे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी श्रीमती संगितादेवी पाटील यांनी प्रास्तविक भाषणात, जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला असून यापुढे ३६५ दिवस काम करण्याची जबाबदारी वाढली आहे मार्चपर्यंत सर्व नियोजन करून गावगाव बैठका आणि दशसूत्री उजळणी, प्रशिक्षण आणि यापुढील शाश्वत उपजीविकेसाठी वाटचाल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी बचत गटाच्या प्रदर्शनास सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाच दिवस देण्यात घेतली. यावेळी उल्लेखनीय काम केलेल्या सर्वांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.