पुणे:विद्येचा माहेरघर आता गुन्हेगारांचा माहेरघर होत आहे का? असा प्रश्न आता पुणेकरांना पडू लागलेला आहे. चाकण एमआयडीसी परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सुमारे 11 वाजता, दोन अज्ञात हल्लेखोर मोटरसायकलवर आले आणि कैलास स्टीलच्या मालक अजय सिंग यांच्यावर गोळ्या झाडल्या. अजय सिंग यांच्या पोटात आणि पाठीमागे गोळ्या लागल्या असून, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
अजय सिंग यांनी कोणतीही खंडणी मागणी झाल्याचे नाकारले असले तरी, हल्ला खंडणीसाठी झाला असावा असा तर्क लावला जात आहे. प्रारंभिक तपासानुसार, हा हल्ला खंडणी किंवा व्यवसायातून झालेला नाही असे दिसते. पिंपरी चिंचवडचे डीसीपी डॉ. शिवाजी पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हल्ल्याचा नेमका हेतू अद्याप अस्पष्ट आहे आणि सखोल तपास सुरू आहे.
स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेने हल्लेखोरांच्या शोधासाठी 10 ते 12 पथकं नेमली आहेत. हा प्रकार चाकण एमआयडीसी परिसरात घडल्याने येथील व्यापारी आणि रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पुणे जिल्हात
गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत, ज्यात हत्या, गँगवॉर आणि महिलांवरील अत्याचार यांच्या घटनांचा समावेश आहे.
गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे जिल्ह्याला भेट देऊन पोलीसांसोबत चर्चा केली आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्याच्या उपाययोजना केल्या. या प्रयत्नांनंतरही, अलीकडील गोळीबाराच्या घटनेने पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात अडचणी आल्याचे स्पष्ट केले आहे.
अधिकार्यांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचे आणि या हल्ल्यामागील उद्देश शोधून काढण्याचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत, या घटनेमुळे स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांमध्ये चिंता वाढली आहे.