बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यामध्ये ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांवर धक्कादायक खंडणी
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यामध्ये ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावच्या माजी सरपंचाने एक लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरपंच मंगल राम मामडगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनंतर माजी सरपंच, एक सदस्य तसेच उपसरपंचाचा पती या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर आणि उपसरपंच पदावर सुद्धा महिला आहेत.
आरोपी विविध कारणे सांगून विकासकामांमध्ये अडथळे सातत्याने आणत होते, खोट्या तक्रारी सुद्धा दाखल करत होते. दुरुस्तीसाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली होती, अशी तक्रार सरपंच मामडगे यांनी केली आहे. पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.