अंबाजोगाई होऊ शकते नवीन जिल्हा; 26 जानेवारीला घोषणा होण्याची शक्यता

मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) लवकरच प्रशासकीय पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार महाराष्ट्रात तब्बल २१ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा विचार करत आहे.

प्रस्तावित नवीन जिल्ह्यांमध्ये जळगावमधील भुसावळ, लातूरमधील उदगीर, बीडमधील अंबेजोगाई, नाशिकमधील मालेगाव आणि कळवण, नांदेडमधील किनवट, ठाण्यातील मीरा-भाईंदर आणि कल्याण, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांतून मिळून माणदेश, बुलढाण्यातील खामगाव, पुण्यातील बारामती, पालघरमधील जव्हार, अमरावतीमधील अचलपूर, भंडाऱ्यातील साकोली, रत्नागिरीतील मंडणगड, रायगडमधील महाड, अहमदनगरमधील शिर्डी, श्रीरामपूर आणि संगमनेर, गडचिरोलीतील अहेरी आणि यवतमाळमधील पुसद या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होईल आणि स्थानिक पातळीवर विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना आव्हानेही असू शकतात, ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे पायाभूत सुविधा, प्रशासकीय यंत्रणा आणि इतर बाबींवर होणारा परिणाम याबाबत सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.

नवीन जिल्ह्यांची घोषणा केव्हा होणार?
अद्याप या प्रस्तावाला अधिकृत मान्यता मिळालेली नसली तरी, येत्या प्रजासत्ताकदिनी या संदर्भात घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!