इडीने सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा: ईडीची कारवाई तीव्र, ठेवीदारांना मोठा धक्का

बीड: मराठवाड्यातील हजारो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर अमंलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या कंपनीचे चेअरमन सुरेश कुटे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 1433 कोटी 48 लाख रुपये इतकी आहे.

काय आहे प्रकरण?
सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून जवळपास 2470 कोटी रुपये गोळा केले होते. या ठेवीदारांना 12-14% व्याजदराचा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, कुटे दांपत्य यांनी या पैशाचा गैरवापर करून कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जांच्या स्वरूपात वाटप केले. ईडीच्या तपासात असेही समोर आले आहे की, कुटेंनी अनेक बँक खात्यांतून थेट पैसे काढून घेतले.

ईडीची कारवाई
या प्रकरणी कुटे आणि कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत मे ते जुलै 2024 दरम्यान विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वीच ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि पुण्यातील शाखांमधून तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त केली होती.

राज्याबाहेरही पसरलेले जाळे
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. ईडीच्या कारवाईनंतरही या प्रकरणातील गुंतागुंत उलगडतच आहे.

ठेवीदारांची चिंता वाढली
या घोटाळ्यामुळे मराठवाड्यातील हजारो ठेवीदारांचे लाखो रुपये अडकले आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. ईडीची कारवाई सुरू असली तरी, ठेवीदारांना आपले पैसे परत मिळतील की नाही, याबाबत अद्याप शंका व्यक्त केली जात आहे.

काय आहे पुढील वाटचाल?
ईडीचा तपास अद्याप सुरू असून या प्रकरणावर पुढील कायदेशीर पाऊल कसे उचलले जाईल, याकडे ठेवीदारांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात अडकलेल्या पैशांची वसूली करून ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

error: Content is protected !!