सरपंचाने स्वत:च रचला होता हल्ल्याचा बनाव, तुळजापूरच्या घटनेची भांडाफोड, पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर

तुळजापूर सरपंच हल्ला प्रकरण: बनाव उघड

धाराशिव: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाने महाराष्ट्र हादरला असतानाच, धाराशिवच्या सरपंचावर झालेल्या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील सरपंच नामदेव निकम यांनी बंदुकीचा लायसन्स मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

सरपंच नामदेव निकम यांनी रात्री बारूळ गावातून आपल्या कारने जवळगा मेसाई गावाकडे परतत असताना, दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकत जीवघेणा हल्ला केल्याचे वृत्त होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याचे समोर आले होते. मात्र, पोलीस तपासात हल्ल्याचा सगळा बनाव खुद्द सरपंचानेच केला असल्याचे उघड झाले आहे.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी तपासाची चक्र फिरवली असून, बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंच नामदेव निकम यांनी हे कुभांड रचल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!