देशमुख हत्या प्रकरणात मारेकऱ्यांना फाशी द्या पण, ना. धनंजय मुंडेंना टार्गेट करून राजकारण करू नका
बीड (प्रतिनिधी): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करताना काही पुढाऱ्यांनी केलेला नाटकीपणा जनतेसमोर उघडा पडला आहे. दुःखद घटनेच्या प्रसंगी पुढाऱ्यांनी केलेली भाषणे, लोकप्रतिनिधींचे बोलतानाचे हावभाव आणि त्यांचे वर्तन लोकांना पटलेले नाही. यातून केवळ ना. धनंजय मुंडे यांच्या विरोधातील वैयक्तिक विरोध दिसून आला आहे.
फारुक पटेल, बीड नगरपालिकेचे गटनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, म्हणाले की, “धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची भाषा असलेली चॅटिंग आणि दुःखद घटनेचा मसाला म्हणून केलेला शब्दप्रयोग म्हणजे या पुढाऱ्यांना देशमुख यांच्या हत्येचे दुःख अजिबात नाही. या सर्वांनी त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.”
धनंजय मुंडे यांनी नेहमीच सामाजिक धोरण समोर ठेवून राजकारण केले आहे. त्यांनी कधीच जातीय द्वेष करत कामे केलेली नाहीत. त्यामुळेच आजही सर्व जाती धर्मातील लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी आहे. या प्रकरणातील जे कोणी उर्वरित आरोपी असतील त्यांना अटक करून फासावर लटकवा. हत्या प्रकरणात ज्यांची नावे पुराव्यानिशी सिद्ध होतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी फारुक पटेल यांनी केली आहे.
मात्र या प्रकरणात ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते थांबवणे गरजेचे आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव विनाकारण या प्रकरणाशी जोडले जात आहे. राजकीय सोयीसाठी एखाद्या कर्तुत्वान आणि जनतेतून पुढे आलेल्या नेत्याला टार्गेट करणे कितपत योग्य आहे? तपास यंत्रणेत कुठेही त्यांचे नाव किंवा सहभाग समोर आलेला नाही. तरीही त्यांच्यावर गंभीर आरोप करणे हे लोकप्रतिनिधींना शोभणारे आहे का? धनंजय मुंडे हे केवळ जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेते आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वावर आणि जनतेच्या आशीर्वादावर राज्य गाजवलेले आहे. मात्र त्यांचं मोठं होणं हे अनेकांच्या नजरेला खटकत आहे. त्यामुळेच ओढून ताणून त्यांचा या प्रकरणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी वास्तविकतेचे भान ठेवावे. विनाकारण धनंजय मुंडे यांना टार्गेट करून सामाजिक विषमता निर्माण करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
बीडचे आमदारासाठी ही दुःखद घटना झणझणीत विषय
बीडच्या आमदारांनी या प्रकरणात प्रचंड राजकारण केले आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात दोन समाजात द्वेष पसरवण्याची संधी आमदारांनी साधली आहे. अधिवेशनात सभागृहाच्या पायऱ्यांवर उभे राहून पत्रकारांशी बोलण्याआधी आ. भाई जगताप यांच्याशी कुजबुज करतांना “माझ्याकडे झणझणीत विषय आहे” या पद्धतीने या दुःखद घटनेचा उल्लेख केला. हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला असून ते संभाषण न्यूज चॅनेलवर देखील प्रसारित झालेले असल्याचे फारुक पटेल यांनी सांगितले.