संतोष देशमुख हत्या प्रकरण: गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया
बीड, दि. २७: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात असेल, वंजारा समाजाला टार्गेट केले जात असेल तर हे योग्य नाही, असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, तपास यंत्रणेला त्यांचे काम करू द्या, पण कोणी या घटनेच्या आडून धनंजय मुंडे यांना पदावरून दूर करण्याच्या मागण्या करणार असेल तर आम्ही सुद्धा धनगर, वंजारी क्रांती मोर्चा काढू.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उद्या बीडमध्ये मोर्चा निघत आहे. मात्र, या मोर्चाला गुणरत्न सदावर्ते यांनी आव्हान दिले आहे. त्यांनी विचारले की, मोर्चाचा हेतू काय आहे? यातून जातीय तेढ केली जात आहे का? धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद टार्गेट केले जात आहे हे योग्य नाही. आमदारांना या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे, मात्र आमदार आपली शपथ विसरले आहेत.
सदावर्ते यांनी विचारले की, एखाद्याच्या मृत्यूचे किती राजकारण करावे याला काही मर्यादा असतात. धनंजय मुंडे सहआरोपी असल्याचे काही पुरावे आहेत का कोणाकडे? मग विनाकारण का टार्गेट केले जात आहे? यातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आ. सुरेश धस आणि बीडचे आमदार का करीत आहेत?
जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, कोणीही कायदा हातात घेण्याची भाषा करू नये. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, मात्र आज वाल्मिक कराड यांना फाशी द्या म्हणणारे लोक, त्यांनी न्यायालय बनून कोणालाही दोषी ठरविले आहे का? धनंजय मुंडे जनतेची कामे करतात म्हणून त्यांना राजकारणातून बाजूला करण्यासाठी कोणी कोणत्या मोर्चाच्या नावाने राजकारण करणार असेल तर आम्ही देखील बहुजन मोर्चा भूमिका घेऊ, असे सदावर्ते यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.