बीड शहरात सर्वपक्षीय मोर्चासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरात 400 अंमलदार, वाहतुकीचे 70 अंमलदार, 4 पोलीस उपाधीक्षक, इन्चार्ज ऑफिसर, आणि एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक तैनात असतील. याशिवाय, दंगल नियंत्रण पथकाच्या 6 पथके, राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 एसआरपीएफ कंपनी आणि अधिक अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे.
मोर्चामुळे बीड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ज्या मार्गावरून मोर्चा जाणार आहे, तिथे विशेष खबरदारी बाळगण्यात येणार आहे. मोर्चा ज्या भागातून जाईल तेथील इमारतींवर नजर ठेवली जाणार आहे. या मोर्चात वाहनांना प्रवेश देऊ नये आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याने याबाबतची अधिक माहिती सीआयडीच्या माध्यमातून दिली जाईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले आहे.