मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांना संतोष देशमुख हत्याकांडाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, संतोष देशमुख हा माझा बुथप्रमुख होता आणि माझ्या निवडणुकीत त्याने काम केले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावरून एसआयटी चौकशीची पहिली मागणी मीच केली होती. या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप व्यक्त केला आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत, त्यामुळे माझ्या लेकराला न्याय मिळेल असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा बीडच्या मस्साजोग प्रकरणावर भाष्य करत राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. प्रस्तुत प्रकरणात सर्वप्रथम मीच एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील असा मला विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
पंकजा मुंडे मंदिराच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, “मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे. मी खोटे बोलत नाही व बोलणारही नाही. या प्रकरणी सर्वात अगोदर मी गोपीनाथ गडावरून एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. त्या क्रूर प्रकरणाचा मी क्रूर संताप व निषेध व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे ते या प्रकरणात जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील.”
मयत संतोष देशमुख माझा बुथ प्रमुख होता. तो माझ्याबरोबर काम करत होता. त्याने एक चांगला सरपंच म्हणून काम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे.
ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या विदारक अवस्था बदलण्याच्या मुद्यावर बोलताना पंकजा म्हणाल्या, “ही विदारक अवस्था बदलण्याची गरज आहे. एखादा गुन्हा झाला तर गुन्हेगाराला शिक्षा देण्याची गरज आहे. मी काल टीव्ही लावला, बारामतीमध्ये 23 वर्षीय तरुणाचा खून, पुण्यात अजूनही कोयता गँगची दहशत आहे. सर्वच ठिकाणी हे घडत आहे. त्यामुळे त्याच्यात कोणतेही राजकारण, कोणतीही सनसनाटी न करता, त्यात सामान्य माणसाला वाटावे की सरकार न्याय देत आहे असे वाटावे अशी भूमिका आम्ही सर्वांनी घ्यायची आहे, मुख्यमंत्री घेतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे मजुर, ऊसतोड मजुरांसह सर्वच गरिबांचे उत्थान आपल्याला करायचे आहे.”