परभणी: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दलित बहुजनांचा तिरस्कार आहे का? असा सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकदाही दलित अत्याचार झालेल्या ठिकाणी भेट दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस जेव्हा गृहमंत्री होतात, तेव्हा कायदा सुव्यवस्था बिघडून दलितांवर हल्ले कसे काय होतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दीपक केदार यांनी परभणीतील दिवंगत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बीड आणि परभणी घटनांवरून राज्य सरकारवर आरोप केले. दीपक केदार म्हणाले की, परभणी प्रकरण हे रमाबाई आंबेडकरनगर गोळीबार सारखं प्रकरण आहे. मनोहर कदमच्या भूमिकेत अशोक घोरबांड होता. जवळपास दहा जणांच्या हत्याकांडाचे षडयंत्र असावे. मनोहर कदमला शिक्षा झाली असती तर हा घोरबांड निर्माण झाला नसता. आम्हाला शंका आहे की घोरबांडला कर्मठ हिंदुत्ववादी संघटनांनी ट्रेनिंग दिले असावे. त्याची जातीयवादी वृत्ती ही एखाद्या संघटनेशी जोडल्या सारखी आहे. त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे.