खांडबार – नंदुरबार रस्त्यावर 30 पेक्षा अधिक लोक प्रवास करत असणारी पिकअप गाडी पलटल्याने भीषण अपघात झाला आहे. ढेकवद – बालआमराई गावादरम्यान असलेल्या वळणावर आज रात्री साडे आठच्या सुमारास पिकअप गाडी पलटी होऊन ही दुर्घटना झाली.
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होत हा अपघात झाला आहे. या पिकअपमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते. गाडीतील सर्व प्रवासी हे धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील शेवाळी येथील रहिवासी असून नवापुर तालुक्यातील नवापाडा येथे मानतेसाठी ही सर्व मडंळी आली असल्याचं समजत आहे.
या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सर्व जखमींना नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील चार जणांना गंभीर दुखापत असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या गाडीमधल्या प्रवाशांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता.
दरम्यान, लॉकडाऊन काळात प्रवासावर मोठे निर्बंध आणण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील रस्ते अपघातात मोठी घट झाली होती. मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू होताच पुन्हा एकदा गाड्या धावू लागल्या आणि अपघाताचं प्रमाणही वाढल्याचं पाहायला मिळालं.